Friday 25 November 2011

सहजीवनाचा प्रवास


मला जेव्हा माहेरच्या दिवाळी अंकासाठी ' तुमच्या सहजीवनाबद्दल लिहाल का?', असं विचारलं तेव्हा मी जरा चाचरले.कारण मला आणि अतुलला एक ' जोडी ' म्हणून कोणी बघावं,असं आम्हाला दोघांना ही अपेक्षित नाही . आम्ही दोघंही, व्यक्ती(individuals) म्हणून वावरणं जास्त पसंत करतो. शिवाय, 'सहजीवन' हा शब्द इतका गोड आहे की त्याच्या आडचे सगळे त्रास आणि व्याप लपून जाण्याची भीती वाटते.म्हणूनच, 'आमचं आयुष्य कसं गोड आहे' किंव्हा 'आम्ही कसे आदर्श जोडी आहोत',वगैरे -वगैरे मुळीच भासवायचं नव्हतं . मग विचार आला की ,'अरे हो!...आपण हेच सांगितला पाहिजे.' आज माझे अनेक मित्र- मैत्रिणी,भाचे- भाच्या 'लग्न करावं की नाही?' , commitment द्यावी का नाही ? या गोंधळात आहेत.कदाचित आपल्या अनुभवातून काही हाती लागेल,असा विचार करून,आमच्या सहजीवनाचे अनुभव या लेखात सांगत आहे. माझी आणि अतुलची ओळख ही एन.एस. डीतली (National School of Drama). आम्ही दोघं तिकडे शिकत होतो.घरापासून दूर, होस्टेल मधे राहताना त्या परक्या वातावरणात आपण एक आधार शोधत असतो (emotional support). तसंच आमच्या बबतीत झालं.मी पुढाकार घेतला. त्याने होकार दिला आणि आमचं प्रेम जमलं.खरं सांगायचं तर ते आम्ही ठरवलेलं लग्नच होतं.
आम्ही लग्नं ठरवलेलं अतुलच्या घरच्यांना मान्य होतं . पण माझे घरचे मात्र चिंतेत होते.घरची परिस्थिती साधारण आणि जावई नट , ज्याचं काही निश्चित उत्पन्न नाही,हे स्वीकारणं जड जात होतं. पण मी निर्णय आधीच घेतला होता त्यामुळे त्यांना दुसरा काही पर्याय न्हवता. मी पास-आउट झाल्या-झाल्या सहा महिन्यातच आमचं लग्न झालं.खरतर मला लगेच लग्नं न्हवत करायचं.कामाकडे लक्ष दयावं असं वाटत होतं.पण मला मनाजोगतं काम करण्यासाठी स्वतंत्र राहणं ही आवश्यक होतं.आणि लग्नं केलं तर ते आपसूक होईलच असं वाटलं .आम्ही दोघं एकाच क्षेत्रातले असल्या कारणानं त्याबद्दल मी निर्धास्त होते.आणि कामाबाबत ते खरंही ठरलं. आमचं कामाचं क्षेत्र आमच्यातला महत्वाचा दुवा आहे. पण दोघांची एकत्र राहण्याची मानसिक तयारी होती असं वाटत नाही,कारण पहिले तीन-चार वर्ष जुळवून घ्यायला खूप त्रास झाला. अनेकदा हे काही जमणार नाही असंच वाटायचं.लग्न किंव्हा सहजीवन व्यतीत करायचं असेल तर आधी एकत्र राहून आपलं जुळतंय का हे बघणं फार आवश्यक आहे, असं मला वाटतं. वेगळ्या घरांमध्ये राहताना आणि एकत्र राहताना खूप फरक असतो.वेगळ्या घरा मधे राहताना तुम्ही काही तासांकारातच एकत्र असता,पण एकत्र राहताना सतत सहवास असतो..आज मागे वळून पाहताना असं वाटतं की एन.एस.डी ही जागा प्रेमासाठी योग्य होती हे नक्की, पण लग्न ठरवण्यासाठी नाही.दोघांच्याही दृष्टीने लग्नानंतरचा हा काळ म्हणजे 'dark ages' सारखा होता.पण,' renaissance period' हा 'dark ages' नंतरच येतो,आणि तसंच झालं. सुरुवातीच्या या त्रासाच्या काळाने आम्हाला प्रगल्भ केलं.या त्रासदायक काळानेच जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन तयार केला.आम्ही दुरावलेलो होतो तेव्हा,' आपण कोण आहोत?.'...,'आपल्याला कसं जगायचंय?'....,'आपल्याला काय हवंय?'...,अश्या मूळ अस्तित्वाबद्दलच्या प्रश्णांना सतत सामोरं जावं लागत होतं. खूप ताण होता.पण मैत्री होतीच. .मला वाटतं आम्ही मित्र म्हणून जास्त क्लिक होतो,त्यामुळे नवरा-बायको मधला संघर्ष मैत्रीमुळे निवळतो.मैत्रीमुळे नवरा-बायको हे नातं अलिप्ततेन बघता आलं, त्यामुळे ही कदाचित सहजीवन व्यतीत करताना मदत झाली.जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा लक्षात यायचं की, आपण जर एकत्र राहिलो तर एकमेकांना त्याची मदतच होणार आहे.अर्थात दोन भिन्न स्वभाव एकत्र आल्यामुळे तडजोड ही आवश्यकच होती.पण एकमेकांना समजून घेणं शक्य आहे असं दिसतही होतं.मघाशी म्हणल्या प्रमाणे, आमच्या क्षेत्रा मुळे आम्ही जवळ आलो आणि ते आमच्या नात्यातलं बलस्थान आहे.त्याच्या मुळे आम्ही माणूस म्हणून प्रगल्भ होत गेलो .आणि त्यामुळेच आमचं नातं घट्ट होण्यात मदत झाली. 'संगीत देबुच्या मुली', हे नाटक करत असताना, वि. का.राजवाडे यांचं,'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ' वाचण्यात आलं.आणि माझं स्त्री -पुरुष संबंध, लग्न संस्था, या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.मनुष्य हा पोलीगामेस(polygamus) /पोलीअन्द्रिएस ( polyandreas ) प्राणी आहे. लग्न ही काही नैसर्गिक गोष्ट नाही, ती एक सिस्टीम आहे.मग लक्षात आलं की जर ही एक सिस्टीम असेल तर सिस्टीम मधे उतार-चढाव, अडचणी वगैरे येणारच. ती आदर्श असू शकत नाही आणि शिवाय सगळ्यांची सारखी ही असू शकत नाही. जशी माणस वेगळी, तशी , ते एकत्र आल्यानंतर जी सिस्टीम बनेल ती ही वेगळीच असणार. आणि त्या माणसांच्या स्वभावानुसार ती बदलणार.त्यात चूक-बरोबर असं असूच शकत नाही.एक सारखा साचा असूच शकत नाही.या पुस्तकामुळे अक्षरशःविचार घुसळून निघाले.नात्याकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला .आपण किती रोमांटिक कल्पनाविश्वात वावरत असतो.किती अतार्किक अपेक्षा करतो.मला वाटतं,सध्या आपण या सिस्टीम च्या एका अश्या टप्-प्यावर आहोत ज्याच्यात अमुलाग्र बदल घडणारेत ,त्यामुळे आत्ताची गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. या गोंधळातूनच कदाचित काही मार्ग सापडतील ज्याचा फायदा पुढच्या पिढीला भोगता येईल .
याच काळात देव-धर्म या विषयीच्या मतांमध्ये परिवर्तन घडलं.आज , आम्ही दोघंही कुठल्याही देवकार्य वगैरे मधे विश्वास ठेवत नाही. देव ह्या संकल्पनेत ही खूप बदल झाला. मला नक्की देव म्हणजे काय?,धर्म म्हणजे काय?,...या सगळ्याचा विचारच नव्हता.ज्यांना जे वाटतंय त्यात आपली होईल ती मदत करायची असं होतं.माझ्या सासूबाई गौरी-गणपती करायच्या त्यात मदत करायची, अतुल पूजा करायचा, त्यात मदत करायची.पण स्वतःचा असा विचाराचं केला न्हवता. यात मला विपशाना उपयोगी पडली. अतुलला ही विपशनेचा खूप उपयोग झाला. आज आमच्या घरी कुठलं ही कर्म-कांड,पूजा -अर्चा होत नाही. या उहापोहातून माणूस म्हणून बदल होत गेला आणि हा जगणं अधिक आनंदमय होत गेलं.
दोन व्यक्ती जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांची कुटुंब ही एकत्र येतात.प्रत्येक कुटुंबं आपापल्या पद्धतीनं जगत असतं.त्यामुळे जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात तेव्हा त्यांना अडचणी तर येणारच.मला आणि अतुलला ही त्या आल्याच. माझ्या सासू- सास्र्यांनी मला नेहमी समजून घेतलं. त्या दोघांचा प्रेमळ स्वभाव आणि साधेपणाने मुळे मला कायम त्यांच्या विषयी आदरच वाटला. अनेकदा तडजोड करावी लागली, तेव्हा चिडचिड झाली. किंवा मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागल्या, तेव्हा त्रागा ही केला. पण मला नेहमी वाटायचं, की जशी मला माझ्या आई-वडिलांबरोबर अडजस्टमेंट करावी लागते तशी ह्यांच्याबरोबर ही केली तर त्यात काय हरकत आहे .चार लोक एकत्र आली की जमवून घ्यावाच लागतं.अगदी मित्र-मैत्रिणी असोत किंव्हा कामाचं ठिकाण असो.पूर्वी मला वाटायचं की मला जितकं जमवून घ्यायला लागलं तितकं अतुलला नाही करावं लागलं .पण आज,त्याच्या पुढाकारामुळेच माझे आई-वडील आमच्या बरोबर राहतात . आज तो ही अडजस्ट करतोच.
आमच्या मूल न होऊ देण्याच्या निर्णयाला सुद्धा दोन्ही कुटुंबांनी साथ दिली आहे.वेगवेगळे विचार हे असणारच .हे सगळं समजुन घेऊन, एकमेकांना आपापली स्पेस देणारी लोक असतील तरच हे सहज शक्य होतं.अर्थात ह्या सगळ्यासाठी काही काळ जावा लागतो.ही ' two - minute ' रेसिपी नसून भरपूर वेळ देऊन बनणारीपाककृतीआहे.
आमच्या लग्नाच्या वेळेस आमची आर्थिक स्थिती काही फार बरी न्हवती.अतुल कडे एक नाटक होतं (गांधी विरुद्ध गांधी ) आणि मी नुकतीच एन. एस.डी तून आले होते.पण पैश्यामुळे आमचं कधीही अडलं नाही. आमच्या गरजा कमी असल्यामुळे अमचा खर्च फार न्ह्वता . जेव्हा जशी परिस्थिती होती तसे आम्ही राहिलो.आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. आमचे पहिल्या घराचे मालक, खंडकर कुटुंबीय आणि त्यानंतरचे घरमालक , निगळे कुटुंबीय,यांची खूप मदत झाली.पहिली सहा वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहिलो आणि त्यानंतर स्वतःच्या घरात गेलो.अजून एक म्हणजे आमच्या जीवन जगण्याच्या विचारांमध्ये फार तफावत नाहीये . घरात कमी समान असावं, कमीत- कमी इलेक्ट्रोनिक सामानाचा वापर कारावा,वैयक्तिक कपडे देखील गर्जेप्रमाणे असावे,असं दोघांना वाटतं.पंखा किंव्हा ए.सी आम्हाला दोघांना ही सहन होत नाही. त्यामुळे रोजचं जीवन जगताना कमी अडचणी येतात . आमचं घर रेनोवेट करताना मी एक झेन विचार वाचला होता ,'The soul of a house is in its emptiness .' आम्हाला दोघांना हे लगेच पटलं.आणि आज ही आमच्याकडे खूप कमी समान आहे.वाशिंग मशीन, मैक्रोवेवओवन, कॉट,सोफा,ए.सी,टी.व्ही(satelite connection ), हे काही नाहीये. आणि घरातला हा 'emptiness ', खूपच सुखावह आहे.
आम्ही दोघंही आमच्या कामाबाबत खूप passionate आहोत.आमचं काम आमच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे.ते केवळ पैसे मिळवण्याचं माध्यम नसून, आमचं जीवन समृद्ध करण्याचा मार्ग आहे....,आनंद मिळवण्याचा मार्ग आहे.मला वाटतं फार कमी लोकांना त्यांना ज्याची आवड असते तोच व्यवसाय निवडता येतो.आम्ही दोघंही त्या नशीबवान लोकांमध्ये मोडतो. माझ्यासाठी नाटक किंव्हा अभिनय हे स्वतःला शोधण्याच माध्यम आहे.स्वतःला सामोरं जाण,उलगडत जाण आणि जेव्हा कधी एखाद वेळेला ते सापडलं, असं वाटतं , तेव्हाचा तो 'युरेका' क्षण अनुभवणं , माझ्यासाठी खूप महत्वाच आहे.माझं काम आणि मी हे वेगवेगळ नाहीये.मी सध्या जी नाटकं करतेय आणि ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करतेय त्यामुळे तर मला ह्याबाबतीत अधिकच स्पष्टता आली आहे.अश्या अव्यावसायिक नाटकांमध्ये सतत काम करणं हे, अतुल मुळेच शक्य झालं.हे नुसता पैसा ह्या दृष्टीने नाही, तर त्यान ह्या पद्धतीच्या नाटकांमध्ये स्वतः काम केलं आहे, शिवाय तो त्यांचं महत्त्व ही जाणतो.मी खूप नशीबवान आहे.मला अतुलच्या आई- वडिलांनीच न्हवे तर अगदी सगळ्या कुटुंबांनी नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन दिलय.ह्या कुटुंबांनी मला जे प्रेम दिलय त्यानी मी नेहमीच भारावून गेलीय.
अतुल एक पाप्युलर अक्टर आहे.अनेकदा त्याची भरभरून स्तुती होते किंव्हा कधी- कधी टीका ही होते.त्यावेळेस त्याला आपल्याला जे वाटतंय ते स्पष्टपणे सांगणं महत्वाचं असतं.आपण जेव्हा माणूस म्हणून एकमेकांना चांगलं ओळखतो, तेव्हा त्याच्या कामाचं ही त्या अनुशंगान अनालिसिस करू शकतो.निदान अभिनयाच्या बाबतीत तर हे लागू होतच.याचा फायदा आम्हाला दोघांना होतो.'निंदकाचे घर असावे शेजारी', अशी म्हण आहे, पण आम्ही एकाच घरात राहतो. अगदी सहज एकमेकांच कौतुक अजिबात करत नाही. पण त्यामुळेच कामाबाबत अधिक स्पष्टता येते.
आमच्या प्रोफेशन व्यतिरिक्त इतर क्षेत्रात आमचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांच्या मुळे आमच्या जगण्याला एक वेगळा पैलू मिळाला.निलेश निमकर हे 'प्राथमिक शिक्षण' या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यानी सुरु केलेल्या एका अभ्यासगटात आम्ही जायचो.त्याच अभ्यासगटात 'Quest '(क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट),ही एन.जी.ओ अस्तित्वात आली,जी आज वाडा या तालुक्यात ,सोनाळे गावात ' प्राथमिक शिक्षण' या क्षेत्रात काम करते.आम्ही दोघंही या संस्थेच्या कामामध्ये भाग घेतो. अतुलचा व्यवस्थापनात सहभाग असतो. मी तिथल्या आमच्या शिक्षकांना 'theatre in education ',म्हणजे नाटकात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा शिकवताना कसा वापर करता येऊ शकतो ,ह्या विषयाची कार्यशाळा घेते. केतकी घाटे आणि मानसी करंदीकर,या आमच्या मैत्रिणी पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करतात. साताऱ्याजवळ, वन कुसवडे या गावात आम्ही आमच्या नातेवाईकांबरोबर एक २५ एकर जमीन घेतली आहे. त्या जमिनीवर तिथल्या वातावरणानुरूप जवळ-जवळ १५०० झाडं लावली आहेत.शिवाय तिथे आवश्यक पर्यावरण संवर्धनासाठी लागणाऱ्या इतर सेवा ही त्या उपलब्ध करून देतात.हे सगळं सांगण्याचं कारण हे की अश्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या सानिध्यात आल्यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि अश्या विविध क्षेत्रातल्या लोकांबरोबर काम करणं, आम्हाला दोघांनाही आवडतं.
आमचा मित्र परिवार ही खूप मोठा आहे. सोलापूरच्या नाट्य आराधना मधली मंडळी , माझ्या नाटकांमधलं मित्रमंडळ, सगळे आमच्या घरच्यानसारखेच झालेत.आम्हाला दोघांना ही लोकांनी घरी आलेलं,राहिलेलं आवडतं. आम्ही सिनेमाला दोघच गेलोय असं क्वचितच घडतं. सगळ्यांना जमवून मग सिनेमा- नाटकाला जायचं. आमचे अनेक मित्र-मैत्रिणी आम्ही नसताना देखील आमच्या घरी येऊन राहतात.अर्थात हे सगळं मनेज करणं शक्य होतं ते आमच्या घरी काम करणाऱ्या लोकांमुळे.स्वैपाक करणाऱ्या राधा आमच्या कडे गेली ११ वर्ष काम करतायेत.त्या अगदी मनापासून सगळ्याचं स्वागत करतात.त्यांची आवड-निवडही लक्षात ठेवतात.राम,ईश्वर,सुवर्णा हे सगळे आमचं आणि आई-वडिलांचं घर सांभाळायला मदत करतात.या सगळ्यांच्या मदती मुळेच आम्ही आमचा परिवार वाढवू शकलोय.
या सहजीवनामध्ये मला माझा शोध घेता येतोय,स्वतःला ओळखता येतंय.मी प्रगल्भ झाले, ताकदवान झाले. पण हे सगळं मी माझं स्वातंत्र्य जपलं आणि काम करत राहिले म्हणूनच शक्य झाले.विपशना करताना सांगतात की तुम्ही स्वधर्म ओळखा. मी माझा धर्म काय आहे ,स्वभाव काय आहे हे जाणू शकले तरच मी स्वतःला आनंद देऊ शकेन आणि मी आनंदी असले तरच आजूबाजूच्या लोकांनमध्ये तो पसरवू शकेन. हा लेख लिहितांना मला सहजीवनाची एक व्याख्या सुचलीय,'एकमेकांना सहन करत जगणे, म्हणजे सहजीवन'.मला तरी हे सहन करताना खूप काही मिळालं.पुढे आमच्या जीवनात काय घडणार आहे हे माहित नाही, पण आत्तापर्यंत तरी हे नातं प्रवाही राहलय. असं ऐकून आहे की वेदांमधे असं म्हणलंय, की कुठल्याही जोडीला ७ वर्ष एकमेकांच शरीर समजायला,७ वर्ष बुद्धी समजायला आणि त्या पुढची ७ वर्ष मन समजायला लागतात.आमची १४ वर्ष झाली आहेत ....आता पुढचा प्रवास 'मनाच्या शोधात' !!!!

Song of the Soul

I wander n wander....
Dont know where
To find what??...dont know that
I do this..i do that....
I study...I prepare
make myself ready,to face whatever comes my way
I fall...I win...
Still I wander....
To search what??....dont know that....
I love...I hate....I find my mate...
Still there is something which i miss
Fom the bottom of my heart I ask what's this???...
Dont kow that....
Again I wander...n...wander
In search of what??...dont know that
I work and work...
earn penny ...and more
buy things that i adore
but still, my pot remains empty
and here again I go...
In search of what???...dont kow that..
I find my passion
Now I know where I belong
I get name and fame
people dance to my tune
and want to hear my song...
As i strike the chord...
I ask my soul,is this the note u were waiting for?...
Nah it says...
And yet again I wander n wander...
In search of what??....I dont know that...I dont know what.....