Friday 8 March 2013

This article was written in 2011 for a magazine.
 

अभिनय करताना / An Actor's Process

 

गेल्या दोन तीन वर्षात मी ज्या नाटकान मधे काम केलं आणि करतेय, त्यामुळे अभिनयाच्या प्रोसेस विषयी लिहावं असं खूप मनात होतं आणि ह्या लेखामुळे ही संधी मला मिळाली .मला एन.एस.डी(National School Of Drama ) मधून पदवी घेऊन चौदा वर्ष झाली .पण सुरवातीच्या काळात प्रोसेस बद्दल लिहू शकतो एवढं काम न्हवत , आत्मविश्वास न्हवता आणि गोंधळ ही खूप होता.मी एन.एस.डी गेले तेव्हा माझा अनुभव खूप तोकडा होता. त्यामुळे तिथे मी जे काही शिकले ते सगळं कळून वळायला ही एक काळ गेला.ह्या दरम्यान मला उत्तम दिग्दर्शक आणि सतत नाटकं मिळाल्यामुळे, मी जे काही शिकले होते त्याचा प्रत्यक्ष वापर करता आला आणि त्याची प्रचीती ही येत गेली. 'अज्ञानात आनंद ',अशी म्हण आहे ती खरीच आहे.प्रशिक्षण घेण्याआधी आपण जे करतोय ते उत्तमच आहे ह्यावर विश्वास असल्यामुळे ,ते काम बरच व्हायचं.पण जाणतेपणान काम करताना होणारा त्रास , त्या शोधात येणारी मजा आणि ती सापडल्यावर मिळणारा आनंद, हा 'अज्ञानातल्या आनंदापेक्षा' जास्त रोमांचकारी(adventurous ) असतो ह्याचा प्रत्यय अनुभवागणिक वाढतोय.

एन.एस.डी तून बाहेर आल्यावर प्रचंड गोंधळाची स्थिती होती.आपण जे शिकलोय त्याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा हे कळत न्हवत.पैसे तर कमावण गरजेच होतं त्यामुळे सिरिअल्स ,फिल्म्स किंव्हा अभिनयाच कोणतही काम नाकारणं अवघड होत. अजून स्वतःवर काम करणं गरजेचं आहे ,ही जाणीव ही होती .म्हणून प्रायोगिक नाटक करण गरजेचं वाटत होतं.

त्यावेळेस आणि आत्ताही सातत्याने मुंबईत प्रायोगिक नाटक करणारी एकंच संस्था आहे , ती म्हणजे 'आविष्कार'.मी आविष्कार मधे जायला लागले.' स्वगत कोसळत्या शतकाचे ',हे वसंत आबाजी डहाकेनच्या कवितांवर आधारित अभिनाट्य,ज्याचं दिग्दर्शन गिरीश पतके नी केलं होत ,माझं पहिलं नाटक होतं.त्यात आम्ही जवळ-जवळ पंचवीस नवीन कलाकार होतो. ह्याआधी माझा नाटकाचा असा काही ग्रुप न्हवता.त्यामुळे मला आल्या -आल्या एक चांगला ग्रुप मिळाला ,जे माझ्यासाठी फार गरजेच होतं. अविष्कार च्या इतर अकटीव्हीटीस मधे ही भाग घेत होते त्यामुळे कुठल्या दिशेने जायचं हे थोडाफार लक्षात येऊ लागलं होतं, पण ठाम असं काही हाती लागल न्हवत .नंतर 'वाडा भवानी आईचा'(हौस ऑफ बर्नाडा अल्बा चं मराठी रुपांतर),हे जयदेव हत्तंगडीनी दिग्दर्शित केलेलं नाटक मिळालं.त्यात एक महत्वाची भूमिका ही मिळाली. पण आपण काय आणि कसं काम करतो ह्या पेक्षा आपण चांगलं करतो का वाईट ह्यावर अधिक भर असल्यामुळे मुळात प्रोसेस काय आहे ह्याचा शोध घेता आला नाही.

ह्याच दरम्यान मला परेश मोकाशी भेटला.तो एका नाटकाचा अभिवाचन करू इच्छित होता.'संगीत देबुच्या मुली 'ची पुष्कळ वाचन आम्ही केली.पण नाटक बसवताना माझ्या दुसऱ्या नाटकामुळे मला ते करता नाही आलं .आणि माझा उत्तम चान्स हुकला. पण माझ्या नशिबात ते नाटक होत.त्या नाटकात काम करणारी केतकी थत्ते ची परीक्षा असल्यामुळे तिने नाटक सोडलं आणि मला ते करायची संधी मिळाली.हे नाटक माझ्यासाठी फार महत्वाचं होतं.परेश ची विनोदाची एक विशिष्ठ शैली आहे, ज्याची , मला एक नट म्हणून ओपन -अप व्हायला खूप मदत झाली. माझ्या डोक्यात खूप काही असायचं पण ते प्रत्यक्ष आमलात आणताना लागणारं क्राफ्ट माझ्या हाती आलं न्हवत .पण परेशच्या ह्या शैली मुळे मला ते कळायला लागलं.आपला काय गोंधळ उडतो हे लक्षात आलं.परेश कडू मला खूप शिकायला मिळालं.तो माझा दिग्दर्शक तर होताच पण आम्ही चांगले मित्र ही बनलो.मला त्याचे विचार ,त्याची स्पष्टता त्याचा स्वभाव यांनी मी प्रभावित ही झाले.कारकीर्दीच्या सुरवातीच्या वर्षान मधे असा दिग्दर्शक आणि मित्र मला मिळला हे नशिबच म्हणावा लागेल. ह्या नाटकात, विडम्बनात्मक शैलीत कीर्तन करणर्या दोन मुली, जगातल्या कलहाच मूळ हे स्त्री-पुरुष अश्या दोन जमातींमुळे आहे असं सिद्ध करतात, आणि जगातल्या शेवटच्या उरलेल्या पुरुषाला स्त्री बनवतात.आख्यान असल्यामुळे वाचिक अभिनयावर उत्तम काम झालं.भाषा साधी न्हवती.ज्या कथा होत्या त्या सांगताना एक विशिष्ठ शैली वापरायची होती.मी इंग्रजी माध्यमात शिकलेय त्यामुळे माझं मराठी फार बरं न्हवत.ह्या नाटकामुळे मला भाषेवर काम करता आलं जे आजही उपयोगी पडतं.ह्या नाटकात संपूर्ण परफोरमन्स होता-...गायच ,नाचायचं,प्रेक्षकांना थेट कथा सांगायच्या.नाटकाची मजा घेणं काय असतं, प्रेक्षकांना कसं समोर जायचं , हे सगळं 'संगीत देबुच्या मुली' करताना लक्षात येऊ लागलं.

त्यानंतर चं.प्र.देशपांडे लिखित आणि गिरीश पतके दिग्दर्शित 'बुद्धिबळ आणि झब्बू',ह्या नाटकात मला माझा सूर सापडला.हे नाटक ही विनोदी होत. नवरा बायको यांच्या नात्यामधले डाव-पेचा विषयीच नाटक होतं.माझं ही लग्नं नुकतच झालेल होतं, त्यामुळे मला ही हे डाव पेच लक्षात यायला लागले होते.कुठल्याही कलाकाराच आयुष्य आणि त्याची कला, ही एकमेकांवर अवलंबून असते.जसजसा जीवनातला अनुभव परिपक्व होत जातो तसतसा त्याचा प्रभाव त्याच्या अभिव्यक्ती मधे ही दिसू लागतो,हे मला ह्या नाटका मुळे कळू लागलं. माझ्या लग्नाचा सुरवातीचा काळ फार त्रासाचा होता.पण ह्या दोन्ही नाटकांच्या संहितेने मला स्त्री पुरुष संबंधाबद्दल एक वेगळा दृष्टीकोन दिला.मला ज्या गोष्टी भीषण वाटत होत्या त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला.ही जी आयुष्याची आणि कलेची देवाण-घेवाण होती, तिने मला आपण ह्या क्षेत्रात असल्याने आपलं अनुभव विश्व प्रगल्भ होतय , हे तर लक्षात आणून दिलंच ,पण त्याचबरोबर माझ्या सगळ्या त्रासाचा निचरा, ही केला. एका नटाच्या जीवनाचा त्याच्या कामावर प्रचंड प्रभाव असतो.मला वाटतं हे कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात फार प्रकर्षाने जाणवत.खरतर कोणाच्याही बाबतीत हे घडतच असतं. घरात भांडण झाला की आईच्या हातची भाजी करपते किंवा आमटीत मीठ जास्त पडतं. विख्यात चित्रकार पिकासो च्या बाबतीत म्हणतात की त्यानी त्याच्या चित्रांमधले रंग बदलले की त्याच्या चात्यांना लक्षात यायचं आता त्याची मैत्रीण ही बदलली असणार ते.

दोन एका पाठोपाठ एक विनोदी नाटकं केल्यामुळे खूप फायदा झाला. नटी म्हणून एक क्राफ्ट सापडायला लागलं.विनोदी नाटकान मधे टायमिंग फार महत्वाच असत.मला वाटत ह्या टायमिंग चा उपयोग इंटेन्स रोल्स करताना फार फायद्याचा ठरतो.तुम्ही उगाच एखाद्या मोमेंट मधे रेंगाळत नाही. ही दोन्ही नाटकं प्रायोगिक जरी असली तरी त्याचे पुष्कळ प्रयोग झाले.सातत्याने एका नाटकाचे प्रयोग होणं एका नटासाठी फार महत्वाचं असतं. जोन गिलगुड एका ठिकाणी म्हणतो," I never feel I have a part under control until I have played it in public for at least six weeeks". ह्या दोन्ही नाटकांमुळे मी काय प्रकारची नटी आहे,एक पात्र उभं करताना काय-काय करावं लागतं ,प्रयोग करताना ते पात्र कसं डेव्हलप होतं ह्याचा मला अंदाज यायला लागला. पण तरी अजून खूप काही सापडत नाहीये याची सतत जाणीव होत होती .

प्रायोगिक नाटकाचं पर्व संपलं आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक मला मिळालं.'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी',हे परेश मोकाशी ने लिहीलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक अथर्व थीयेटर्स तर्फे रंगभूमीवर आलं .सगळे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते नवीन होते.त्यामुळे एक वेगळाच उत्साह होता.हे नाटक विनोदी होत.अतिरंजित विनोदी शैली होती.प्रत्येक पात्र हे caricaturish होत.सगळ्या नटांचा तालीमीत सहभाग असायचा. आमची भट्टी मस्त जमली होती.बोंबीलवाडी वेगळ्या धाटणीच नाटक होत,कोणीही नावाजलेले कलाकार किंवा दिग्दर्शक किंवा निर्माता न्हवते .त्यामुळे नाटकाचं भवितव्य काय अश्णार ह्याची काहीच हामी न्हवती.आम्ही अक्षरशः शंभर रुपये नाईट घेत होतो.पण सुदैवाने नाटक चाललं आणि जवळ-जवळ पाचशे प्रयोग झाले.नाटकाच्या ऐनभरात आम्ही दिवसाला तीन-तीन प्रयोग करायचो.ह्या काळात खूप म्हणजे खूप शिकायला मिळालं.एन.एस.डी जे शिकले होते त्याचा प्रत्येक प्रयोग करताना उपयोग तर होत होताच, पण त्याची अनुभूती ही येत होती.रोज तेच करताना नटाला कुठल्या पद्धतीची एकाग्रता आणावी लागते,हे लक्षात आलं. आपण तेच संवाद रोज बोलतो. त्यामुळे ते एकसुरी वाटायला लागतात .त्यातला जिवंतपणा जातो.तो टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्याचे विचार चक्र सुरु झाले.एकसुरी पण घालवायला त्या क्षणी तिथे असणे (play the moment ) ,ह्याला पर्याय न्हवता .नटाला शिस्त असणं किती आवश्यक आहे हे तर वेळोवेळी जाणवायचं. ज्ञानाचं realisation होत होतं.विचार आणि कृती यांची सांगड जमत गेली.अगदी कोणी झोपेतून उठून जरी प्रयोग करायला सांगीतलं तरी करू शकणार होते इतकी तयारी होती .दुबेजी म्हणतात "हजार बार लाईने बोलो तब वोह अपनी होती है".हजार वेळा संवाद म्हणल्या नंतरचा आत्मविश्वास,त्याच्या वरची पकड , आपल्या कंट्रोल मधे आपली भूमिका असल्याची भावना,त्याची मजा घेणं,त्या दिलेल्या फ्रेमवर्क मधे खेळणं .....मौज होती. अख्ख्या भारतात,असा अनुभव फक्त महाराष्ट्रातचं मिळू शकतो .ह्यासाठी मी व्यावसाईक नाटकांची सदैव ऋणी राहीन .literally I was eating,drinking and sleeping theatre.दौरे ,एवढ्या संख्येने प्रयोग,... हे सगळंच नवीन होत.हे करताना शरीराची काळजी घेणे,आवाजाची जोपासना करणे ,उत्साह टिकवणे ह्या सगळ्यावर ही आपसूक काम झालं. आम्ही सगळे नवीन होतो त्यामुळे कोणी 'स्टार' नसल्या मुळे दडपण न्हवत.सगळ्यांमध्ये प्रयोगाबद्दल चर्चा व्हायच्या.सगळे वेगळ्या पद्धतीचे नट होते.त्यामुळे ही खूप फायदा झाला . नाटकाला यश मिळालं. पण मी अजून ही त्या नाटकातली एक कलाकार म्हणूनच ओळखली जात होते. माझं एक स्थान मी निर्माण नाही करू शकले.

बोम्बिलवाडी चे प्रयोग संपता संपताच परेश नी लग्नंकल्लोळ नावाचं नाटक लिहीलं.हे नाटक संगीत नाटक होतं.आम्ही बोम्बिल्वाडीत्ले अनेक नट मंडळी या नाटकात होतो. ह्यात मला पाच विभिन्न भूमिका वाठ्वायच्या होत्या. ह्या नाटकाची प्रक्रिया फार इंटरेस्टिंग होती.नाटकात १९१४ साल दाखवलं होतं.गडकरींच ' ठकी लग्नं' आणि कोल्हटकर यांचं ' सुदाम्याचे पोहे ' ह्यांच्या विनोदी साहित्यावर आधारित होतं.त्यामुळे ह्या साहित्याचं वाचन,त्या काळाचा अंदाज देतील असे चित्रपट, छायाचित्र ,या सगळ्याचा संपूर्ण संचानी अभ्यास केला.ह्या नाटकाला पुष्कळ अवार्ड्स मिळाले.मला ही पहिल्यांदा अभिनयासाठी अवार्ड मिळालं ( उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,अल्फा gaurav ).खर सांगायचं तर अवार्ड्स चा तसा काही उपयोग नसतो.पण नटाला आपल्या कामाची दखल घेतल्याच समाधान मिळतं आणि त्याने उत्साह आणि आत्मविश्वास ही वाढतो.

दोन व्यावसयिक नाटकं करूनही मला पुढे कुठलं ही नाटक मिळालं नाही. काय करावं काही कळत न्हवत.आपण फक्त नाटक करतो आणि एका दर्ज्याच काम ही केलंय, तरीही काम मिळू शकत नाहीये ह्याचा फार त्रास झाला. ह्याच दरम्यान अनिरुद्ध खुटवड नी मला वर्क्शोप साठी बोलावलं.मी सुरुवातीला चाचरले कारण मला शिकवण्यात रस न्हवता. कुठेतरी हे मनात होतं की एन.एस.डी हून आल्यावर लोक वर्क्शोप घेतात,प्रक्टीकॅल काम करत नाहीत.पण अनिरुद्ध नी मला पटवलं आणि मी पाहिलं वर्क्शोप घेतलं.मला स्वतःला अभिनय सहज जमल्या मुळे मी शिकणार्यांना खूप समजावून घेते,त्यांना काय अडचण येत असेल,जे ते विचार करताहेत त्याचं प्रत्यक्ष रूपांतरण करताना काय गडबड होत असेल, ह्या बद्दल मी सहृदय असते .त्यामुळे मी बरी शिक्षक आहे हे मला जाणवलं.शिकवताना स्वतःच्या अभिनय प्रक्रीये कडे ही बघू शकले. अनेक गोष्टी disect करताना उमगत गेल्या.कॉमेडी करतानाच टायमिंग आणि इतर शैलीन मधल्या टायमिंग मधे काय फरक असतो हे रहस्य मला शिकवताना उलगडलं. आज ही मी वर्क्शोप्स घेते.हा माझा फुल- टाइम जॉब नाही .पण वर्क्शोपस घेताना मला खूप काही शिकायला आणि शेअर करायला मिळतं .ज्याचा मला अभिनय करताना उपयोग होतो. आपला अनुभव,मिळालेलं ज्ञान ह्याचा इतरांना तर फायदा होतोच, पण आपल्यालाही स्वतःच्या प्रोसेस कडे बघायची सवय लागते.

'बाई कमालच झाली ' हे मला जवळ-जवळ वर्षभर थांबल्यानंतर मिळालेलं नाटक. विनोदी असलं तरी वेगळ्या धाटणीच नाटक होतं आणि मुख्य म्हणजे वेगळा दिग्दर्शक , वेगळे कलाकार होते .विकास कदम दिग्दर्शक आणि पंढरीनाथ कांबळे (paddy ) मुख्य भूमिकेत होता.मी आत्तापर्यंत केलेल्या नाटकानपेक्षा वेगळ्या sensibility नाटक होतं आणि म्हणूनच मी करायचं ठरवलं.हे नाटक करताना मला माझ्या माणूस म्हणून limitations कळल्या.नाटक तद्दन व्यावसायिक होतं.आत्ता पर्यंतची मी जी नाटकं केली होती ती व्यावसाईक जरी असली तरी त्याला एक intellectual बेस होता.हे नाटक फक्त करमणूक प्रधान तर होतच पण त्याचा विषय ही जरा प्रतिगामी होता.तरी मी नाटक स्वीकारलं कारण प्रत्येक वेळेला आपल्या पद्धतीच काम मिळू शकणार नाही ह्याची मला कल्पना होती.ह्या नाटकामुळे मला क्राफ्ट आणि टायमिंग वर प्रभुत्व आलं.पण विषय फारच पटणारा असल्यामुळे कुठेतरी समाधान मिळत न्हवत. दुर्दैवाने का सुदैवाने माहित नाही पण नाटक काही फार चाललं नाही.

ह्या काळात मी प्रचंड निराशेच्या ( डिप्रेशन) गर्तेत अडकले. मी व्यावसाईक दृष्ट्या समाधानी होते आणि नाही माझ्या वैयक्तिक जीवनात.कस ह्यातून बाहेर पडायचं हे सुधरत न्हवत.माझा एक मित्र एका psychiatrist कडे जायचा.मला ही गरज भासली आणि मी ही त्या कौन्सेलर बाई कडे गेले.कौन्सेल्लिंग मुळे माणूस म्हणून माझ्यात खूप बदल झाले.मला खूप कॉम्प्लेक्स होते .ते सोडवण्यात ह्या सेशन्स ची मदत झाली.मला मानसिक ताकद मिळाली.आपल्या स्वभावाकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टीकोन मिळला.माझं potential मी पूर्णपणे वापरात नाहीये हे लक्षात आलं.आपण काहीतरी नवीन काम केला पाहिजे,स्वताहून काहीतरी निर्माण केलं पाहिजे ह्याची जाणीव झाली.

मी टी.व्ही मालिका शोधायला लागले आणि मला मराठी मधे 'असंभव 'आणि हिंदीत 'एक थी राजकुमारी' नावाची मालिका मिळाली.हिंदी मालिका मी काही फार काळ करू नाही शकले.असंभव मात्र मी पूर्ण केली. मालिका करताना टी.व्ही माध्यमाची ताकद कळली.असंभव च्या एका एपिसोड च्या प्रक्षेपणानंतर मला जवळ-जवळ पन्नास मेसेज आले.ह्या आधी मी अनेक नाटकांचे जवळ-जवळ १००० प्रयोग करूनही मला इतकी प्रसिद्धी न्हवती मिळाली.हिंदी मालिकेमुळे पैसा आणि मराठी मालिके मुळे प्रसिद्धी असं दोन्ही मिळत होतं.पण नाटक करायला पाहिजे त्यात आपल्याला खरी मजा येते, असं सारखा वाटायचं.

एका वर्क्शोप मधे मी, अनिरुद्ध आणि प्रदीप वैद्य एकत्र होतो.तेव्हा मी त्यांना मला आवडलेल्या एका संहितेबद्दल सांगितलं.अनिरुद्ध नी पुढाकार घेऊन ते प्रदीप कडून रुपांतर करून घेतलं.हे सगळं खूप पटकन झालं.आणि 'एक रिकामी बाजू 'नाटक करायचं ठरलं.माझे थोडे पैसे आणि अतुल(अतुल कुलकर्णी,माझा नवरा) कडून लोन घेऊन ह्या नाटकाची निर्मिती केली.हे नाटक स्तनाचा कर्करोग या इश्यू वर होतं .वीणा जामकर ,पद्मनाभ बिंड आणि मी अशी कास्ट होती. ह्या नाटकात मी काम करत होते,आणि निर्मितीही माझी असल्यामुळे खूप जवाबदारी होती.माझी, potential चा पूर्ण वापर करण्याची संधी मला मिळाली.मी खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळ ही मिळालं.ह्या नाटकाचे पस्तीस प्रयोग झाले .नेशनल फेस्टिवल मधे निवड झाली.नाटकाला त्यावर्षीचे उत्कृष्ट प्रायोगिक नाटक ,उत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक,उत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्री आणि शिवाय तीन अजून पुरस्कार मिळाले (झी अवार्ड्स ). माझं असं काही निर्माण करायचं होतं, ते साध्य झालं.ह्या नाटकामुळे मला फक्त नटी म्हणून न्हवे तर एक रंगकर्मी म्हणून perspective मिळालं. नाटकाच्या तालमी,त्याची आखणी,चहा-नाश्ता,नेपथ्य,कोस्च्युम,थियेटर च्या तारखा मिळवणं ,जाहिराती,हिशेब ...वगैरे वगैरे ....सगळी निर्मितीची कामं केली.मागे 'समुद्र 'नाटकाच्या निर्मितीच्या वेळी मिळालेला अनुभव इथे कामी आला .पण तेव्हा परेश,अतुल आणि मी असे तिघं निर्माते होतो.ह्यावेळेस माझी एकटीची जवाबदारी होती. पूर्वी मला फक्त माझं काम चांगलं होतंय का वाईट ह्याची चिंता असायची.पण आता माझा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला.

लेखाच्या सुरवातीला म्हणल्या प्रमाणे ,गेल्या दोन वर्षात जी नाटकं मी केली किंवा करतेय त्यांनी मला अभिनय,नाटक, माणसाची अभिव्यक्ती ह्या कडे अधिक गंभीरतेने बघायला प्रवृत्त केलं.मी ह्या अनुभवांमुळे जास्त focussed झाले. 'Sex , Morality and Censorship ',हे त्यातलं आणि शिवाय हिंदी मधलं ही ,माझं पाहिलं नाटक. सुनील शान्बाघ यांनी हे नाटक बसवलंय आणि शांता गोखले आणि इरावती कर्णिक यांनी लिहिलंय. हे नाटक सेन्सरशिप च्या इश्यू वरचं नाटक आहे.'सखाराम बाईंडर ' नाटकावरची बंदी,ते रंगमंचावर आणतानाचा झगडा ,सत्तरीच्या दशकाचा आवेग, ह्याचं अप्रतिम मिश्रण म्हणजे 'Sex,Morality and Censorship'. ह्यात सखाराम मधले काही प्रवेश ही आहेत .मला लक्ष्मी च्या पात्रासाठी विचारलं.मी लगेच हो म्हणलं.एकतर माझं हिंदी मधलं हे पाहिलं नाटक होत.एन.एस.डी हून आल्यास मी वास्तववादी नाटक केलं न्हवत आणि आजपर्यंत विजय तेंडुलकरांची नाटकं वाचली किंवा बघितली होती ,पण काम करायला पहिल्यांदाच मिळणार होत. हे प्रवेश करताना खूप धमाल आली.तेंडुलकरांची संहिता म्हणजे नटासाठी पर्वणी. त्यांची पात्र, संवाद,लॉजिक,त्यांचा attitude ,नाटकाचं crafting इतकं प्रीसाईझ असतं .हे सगळं वाचून माहित होतं ,पण करतानाची मजा आता अनुभवायला मिळत होती. लक्ष्मी फक्त साधी- सुधी बाई नाहीये .तिचा मुंगी बरोबर बोलतानाचा प्रवेश हा तिच्या शारीरिक इच्छानचच दर्शन घडवतो .तिचं सखाराम ला बदलायला लावणं हे तिचं आत दडलेलं fanatic रूपच आहे. हे सगळं नाटक करताना उलगडत जात होतं. तेंडूलकरांच्या नाटकानमधला पावरप्ले आणि त्यांच्यातली हिंसा ह्याची अनुभूती ही आली.माझं ह्या नाटकाच्या तालीमीन मधे हात फ्रक्चर झाला.ते दुखणं,ती इजा मला लक्ष्मी रेखाटताना उपयोगी पडली.आज पर्यंत या नाटकाचे अनेक प्रयोग झालेत .पण तरी आज ही जेव्हा नाटकाची तालीम करतो तेव्हा ती पात्रं तुम्हाला ओढून घेतात.असच सहज,जाता-जाता ते संवाद तुम्ही बोलू शकत नाही.आता मला क्राफ्ट कळायला लागल्यामुळे त्याची चिंता न्हवती.आता मला शोध होता त्या पात्राच्या सत्याचा. मला हे ही लक्षात आलं की नटाच्या अनुभवाप्रमाणे त्याचा क्राफ्ट ही बदलला पाहिजे.त्यात जास्त रिफाइनमेंट तर हवीच पण अधिकाधिक खोलवर जाऊन त्यातलं सत्य गवसण्याचा ध्यास पाहिजे.मी प्रत्येक प्रयोगात लक्स्मीच सत्य शोधायचा प्रयत्न करते.मला हे ही ध्यानात आलं की, मी माझ्या पात्रांपासून अलिप्त नाही होऊ शकत.आमच्यात एक देणं-घेणं सुरु असतं. जेव्हा एखाद नाटकं बंद होतं ,तेव्हा माझ्यातला ही एक भाग संपतो ,असं मला वाटतं.

ह्या नाटकाने मला मुंबईच्या हिंदी नाटकाच्या वर्तुळात एक नाव मिळवून दिलं. ह्या रोल साठी मला२००९ चं मेटाअवार्ड ही मिळालं (बेस्ट अक्टर फिमेल इन सपोर्टिंग रोल ).ह्यानंतर मी सतत वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर विभिन्न जातकुळीची नाटकं करतेय.सचिन कुंडलकर नी लिहीलेलं आणि सुनील यांनी दिग्दर्शित केलेलं' ड्रीम्स ऑफ तालीम' .मानव कौल लिखित ,दिग्दर्शित 'माम्ताझ भाई पतंगवाले' ,आणि ' हाथ क्या आया?...शून्य ',आणि नुकतच प्रदीप वैद्य नी रुपांतरीत केलेलं आणि मोहित टाकळकर नी दिग्दर्शित केलेलं 'गजब कहाणी '.

'गजब कहाणी' माझ्या साठी फार महत्वाचं नाटक आहे.ह्यात मी एका हत्तीची भूमिका करते.जोसे सारामागो च्या ' एलीफान्त्स जर्नी ' वर बेतलेलं हे नाटक यंदाच्या विनोद दोषी फेस्टिवल मधे याचा पहिला प्रयोग झाला . ह्यात सगळ्यात मोठं आवाहन होत की माझ्या सारख्या पाच फुटी मध्यम बांधा असलेल्या बाई ला १२-१५ फुटाचा महाकाय हत्ती बनायचं होतं. खूप वर्षात ,म्हणजे एन.एस.डी सोडल्यास इतक्या फिसिकॅल रीक्वायरमेंट असलेला रोल मिळाला होता.सगळ्यात आधी शरीरावर काम करणं गरजेचं होतं. नाटक ऐकल्या ऐकल्या मला वाटला की आपण 'योग' शिकायला पाहिजे .माझा एक मित्र मंदार गोखले योग शिकवतो.त्वरित त्याला गाठला आणि शिकायला लागले.त्याच्या कडूनच कलरीपायटू आणि छाऊ च्या काही मुवमेनटस शिकले.ज्याचा वापर आम्ही नाटकत ही केला.मोहित बरोबर काम करणं हा अत्यंत आनंददायी आणि वेगळा अनुभव होता. मला त्याच्या कामाची पद्धत खूप ओर्गानिक वाटली.तो अजिबात इंसट्रकशन्स देत नाही.खूप वेळ देऊन तुमच्यात बदल घडवून आणतो.माझ्या साठी हा अनुभव खूप इंरीचींग(enriching ) होता.ह्या नाटकातलं दुसरं आव्हान होतं ते म्हणजे ह्यातलं narration . लांबच्या लांब वाक्य.ती 'हत्तीपण' जपून म्हणायची .कसं बोलेल हत्ती?..त्याची पट्टी काय असेल?..आवाजाचा पोत,भाषेची लय काय असेल?..हे सगळे प्रश्न मनात घर करून बसले होते.वाचिक अभिनयावर काम करताना अशोक रानडे,दुबेजी यांचे व्यायाम कामी आले.मला हे लक्षात आलं की ह्या संवादांची लय ,आवाजाची क्वालिटी ही non -human वाटली पाहिजे.प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्यावर लक्ष दिलं.कुठे काय काय आणि कसं करायचं हे मनात निश्चित केलं. हत्ती खूप हळवा,हुशार आणि सूक्ष्म जाणीव असलेला प्राणी आहे.मला ह्याचा शोध घ्यायचा होता.ते मी दर प्रयोगात ढूनढाळते . कधी -कधी ते दिसतं, कधी निसटत ...हा खेळ अजून सुरूच आहे.

मला ह्या वर्षीची विनोद दोषी फेलोशिप मिळाली.नाटकातल्या तज्ञ मंडळीनी निवडलेल्या पाच तरुण रंगकर्मींना ही देण्यात येते. माझी निवड ह्या लोकांनी केली ह्याचा मला फार आनंद झाला. माझ्या आत्तापर्यंतच्या नाटकाच्या प्रवासात मला उत्तम नाटकं,उत्कृष्ट दिग्दर्शक आणि चांगले सहकलाकार मिळाले ज्यांच्या मुळे प्रत्येक टप्प्यावर मला शिकायला मिळालं.अजून एक महत्वाची व्यक्ती ज्याच्या मुळे मी नाटकं करू शकले आणि ज्यानी माझ्या कामाची नेहमी उत्तम समीक्षा केली ,ती म्हणजे ,माझा पती अतुल कुलकर्णी.आम्ही आज चौदा वर्ष एकत्र आहोत ह्याच कारण ही हे क्षेत्रच आहे.हे क्षेत्रच आमच्यातला मुख्य दुआ आहे.

अभिनय करताना तुमचं माध्यम हे तुमचं शरीर ,आवाज,भाषा,विचार ,बुद्धी आणि मन असतं.आपण एक भूमिका वठवत असताना हे सगळं घेऊन रंगमंचावर येतो.त्यामुळे अभिनयात 'मी' किंवा 'स्व' खूप महत्वाचा असतो.मला मी कळले तर कुठलही पात्र माझ्यात रुजू शकतं.स्वतःचा शोध घेणे हा अभिनयाच्या प्रवासाचा महत्वाचा भाग आहे.म्हणूनच ग्रोतोव्स्की अभिनयाला 'spiritual journey ' म्हणतो. आत्ता हे लिहिताना मला गजब कहाणीतला एक संवाद आठवतोय,"हे नातं असलं तर पायाखालून किती अंतर निघून गेलं ह्याच भान ही राहत नाही.कुठलाही प्रवास जादुईपणे पार होतो".खरच ह्या क्षेत्रांनी मला दिशा दिली परिपक्व केलं.नाटक हा माझ्या जीवनाचा भाग आहे.मी खूप नशीबवान आहे की मला अशी नाटकं करायला मिळाली ज्यांनी मला पुढे नेलं.माझ्या जीवनाचा शोध मला नाटकामुळे घेता येतो म्हणून मी नाटक करते.