Friday 30 December 2011

वाट पहाणे ....

दाट रात्रीच्या
मिट्ट काळोखात
मन माझं विझल होतं
धुंद सकाळच्या
मंद प्रकाशाची
ते ही वाट पाहत होतं ......
 
अलोट गर्दीच्या
धक्का बुक्कीत
मन चुप्प बसलं होतं
उघड्या जागेच्या
मोकळ्या हवेची
ते ही वाट बघत होतं...
 
कर्कश कानठळ्यानी
सूर बेसूर आवाजांनी
मनाला धस्सं होत होतं
शांत ठिकाणाच्या
निर्वात पोकळीची
ते ही वाट बघत होतं ....